दैनिक दिव्य मराठी :- दिनांक ८ डिसेंबर
नगर - ‘स्नेहालय’ने आजवर केलेल्या कामाची पावती म्हणजे ‘पुलोत्सव कृतज्ञता सन्मान’ आहे. या पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला असून ‘हिम्मतग्राम’च्या उभारणीसाठी नवे बळ मिळाले आहे, असे स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना बुधवारी सांगितले.
स्नेहालयच्या कामाला सन 1989 मध्ये सुरुवात झाली. छोट्या प्रकल्पापासून सुरू झालेले हे काम आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. पुलोत्सव पुरस्काराच्या रूपाने या कामाचा गौरव झाला आहे. त्याचे श्रेय सर्व कार्यकर्त्यांना आहे, असे ते म्हणाले.
स्नेहालयने आता हिम्मतग्रामची उभारणी सुरू केली आहे. निंबळक-इसळक परिसरातील 35 एकर जागेत हा प्रकल्प उभा राहत असून तेथे 100 एड्सबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असेल, असे त्यांनी सांगितले.
हिम्मतग्रामविषयी अधिक माहिती देताना शिंगवी म्हणाले, एड्सग्रस्तांना केवळ औषधोपचारांची गरज नसते. त्यांना स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. त्यासाठी सन्मानाची वागणूक मिळायला हवी. हिम्मतग्राममध्ये राहणारे स्वत:च्या पायावर उभे असतील. त्यांच्यासाठी योग्य काम उपलब्ध केले जाईल. कोणाला शेतीची आवड असेल तर ते तेथे नैसर्गिक शेती करतील, कोणाला सुतारकाम येत असेल तर त्यांना ती साधने उपलब्ध करून दिली जातील. या मंडळींसाठी राहण्या, जेवणाबरोबर सुसज्ज हॉस्पिटलची सुविधा तेथे असेल. सुमारे 200 कोटींचा हा प्रकल्प असून टप्प्याटप्प्याने येत्या 10 वर्षांत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम पूर्ण झाले असून या कामावर देखरेख ठेवण्याचे काम एड्सबाधित मंडळीच करीत आहेत. त्यांनी तेथे फळबागही तयार केली आहे. हिम्मतग्रामच्या उभारणीत सगळ्यांचा सहयोग हवा आहे, असे सांगून शिंगवी म्हणाले, या प्रकल्पासाठी पाण्याची गरज होती. सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन करून पाणी आणण्याकरिता मुंबई येथील अरुण सेठ यांनी आर्थिक सहकार्य केले. बांधकाम साहित्याबरोबर शेतीची अवजारे, ट्रॅक्टर यासाठी इतरांकडून मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. स्नेहालयचा मी अध्यक्ष असलो, तरी हे टीमवर्क आहे. प्रत्येकाच्या कौशल्याचा संस्थेसाठी कसा उपयोग होईल हे पाहून त्यांना कामाचे स्वातंत्र्य दिले आहे. डॉ. गिरीश कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, अंबादास चव्हाण यांच्यासह सर्व टीम 24 तास झटत असल्यानेच संस्थेची क्षितिजे विस्तारत आहेत, पंखांना नवे बळ प्राप्त होत आहे, असे शिंगवी यांनी सांगितले.
गरज आहे हातांची...
परिवर्तनाच्या कामाला पैशांपेक्षा खरी गरज असते हातांची, लोकसहभागाची. लोकांनी स्नेहालयला भेट देऊन तेथील काम पाहावे, अनुभूती घ्यावी आणि या कामात आपल्याला कसे सहभागी होता येईल हे ठरवावे.
डॉ. गिरीश कुलकर्णी, संस्थापक, स्नेहालय.
No comments:
Post a Comment