Sunday, 11 December 2011

कासव जत्रा.! वायंगणीकिनारी


सध्या सर्वत्र जत्रोत्सव सुरू आहेत. या जत्रोत्सवांना कोकणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा असेल, तर या जत्रोत्सवाबरोबरच अनेक प्रकारच्या जत्रा भरवल्या गेल्या पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणून वायंगणीच्या (ता. वेंगुर्ले) समुद्रकिनार्‍यावर ग्रामस्थांच्या सहकार्याने किरात ट्रस्टने २७ ते २९ डिसेंबरदरम्यान ही यात्रा भरविली आहे.
- सुहास तोरसकर, प्राणिमित्र विनायक वारंग। दि. १0 (वेंगुर्ले)
कासव जत्रा..? हो! कासव जत्राच.. पण येथे कासव विकायला येणार नाहीत, तर ही आहे पर्यावरण रक्षणात हातभार लावणारी जत्रा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणीच्या समुद्रकिनारी ती २७ ते २९ डिसेंबरदरम्यान भरणारआहे.
काय आहे ही कासव जत्रा?
ऑलिव्ह रिडले, हॉर्सबिल, ग्रीन कासव, लेदर बँक या काही प्रमुख कासव जातींपैकी ऑलिव्ह रिडले जातीची दुर्मीळ कासवे गेल्या काही वर्षांत दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांत अंडी घालण्यासाठी वायंगणी - वेंगुर्ले, तांबळडेग - देवगड या किनार्‍यांवर येत आहेत. येथे ग्रीन कासव आणि हॉर्सबिलने केवळ एक-दोनदाच दर्शन दिले आहे.
कासवांची ही अंडी संरक्षित करण्याचे कार्य वायंगणी येथील प्राणिमित्र सुहास तोरसकर करीत आहेत. यासाठी त्यांना वनविभागाचे सहकार्य लाभले आहे. वायंगणी किनारा आणि तेथील कासवांची अंडी द्यावयाचा हंगाम हे जागतिक पर्यावरणस्नेही व निसर्गप्रेमींसाठी उत्कृष्ट पर्यटनस्थळ होऊ शकेल. हा विषय आणि जागेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठीच ही कासव जत्रा भरणार आहे.
या उपक्रमात स्थानिक तरुणांना सामील करून घेण्यात यश आले आहे. आता स्थानिक माणसे कासवांच्या अंड्यांचे त्यांचे संर्वधन करून निसर्गरक्षणात खारीचा वाटा उचलणार आहेत.
मानवी हाव जीवघेणी...
माणसाची वाढलेली हाव, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी, जगभरात कासवांचे मांस आणि अंड्यांना असलेली मागणी यामुळे वाळूतील ही अंडी पळविण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. मांसाशिवाय कवचासाठी सुद्धा कासवांची शिकार केली जाते. सध्या कासवांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. ही यात्रा कासवांच्या रक्षणासाठी जनतेत जागृती निर्माणकरेल.
दीर्घायुषी कासव...
कासवाची पाठ जेवढी कठीण असते तितकेच ते दीर्घायुषी असते. कासव शंभर वर्षांपर्यंत जगू शकते. बमादी कासव समुद्रकिनारी एकांतात वाळूमध्ये खड्डा खोदून अंडी घालते. एका वेळी कमीत कमी ४0 ते जास्तीत जास्त १00 अंडी घालते व त्यानंतर तो खड्डा वाळूने भरते. अंड्यांना उष्णता मिळण्यासाठी अंडी घातल्यानंतर मादी कासव पुन्हा समुद्रात जाते. आपली अंडी आणि त्यांतून बाहेर पडणारी पिल्ले यांना ही मादी पुन्हा कधीच पाहात नाही. नैसर्गिकपणेच या कासवांच्या जगण्याचा दर ५0 टक्केच असतो.
सुरक्षित किनारा...
भारतात ओरिसाच्या समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव लाखोंच्या संख्येने अंडी घालण्यासाठी येतात. फार मोठय़ा प्रमाणावर येणार्‍या कासवांच्या संख्येने या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. हा किनारा कासवांसाठी सुरक्षित झाला आहे. अशीच दुसरी जागा म्हणून वायंगणीचा किनारा पुढे आला आहे. सध्या सर्वत्र जत्रोत्सव सुरू आहेत. या जत्रोत्सवांना कोकणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा असेल, तर या जत्रोत्सवाबरोबरच अनेक प्रकारच्या जत्रा भरवल्या गेल्या पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणून वायंगणीच्या (ता. वेंगुर्ले) समुद्रकिनार्‍यावर ग्रामस्थांच्या सहकार्याने किरात ट्रस्टने २७ ते २९ डिसेंबरदरम्यान ही यात्रा भरविली आहे.
- सुहास तोरसकर, प्राणिमित्र

No comments:

Post a Comment