Tuesday, 20 November 2012

'कवा येणार माझा बाबा?'


'कवा येणार माझा बाबा?' (भालचंद्र बालटे)

भालचंद्र बालटे (author@esakal.com)
Sunday, November 18, 2012 AT 01:45 AM (IST)

स्नेहालयात गेलो की, सगळ्या विभागात जाऊन आल्याशिवाय राहवत नाही. विशेषतः स्नेहालयाचे एक प्रमुख कार्यकर्ते भरत कुलकर्णी बरोबर असतील, तर ते अगदी बारीकसारीक माहिती देतात. तीन-चारशे मुलांचे कपडे धुण्यासाठीचा वॉशिंग प्लॅंट, शिलाई विभागात आलेली शिवणयंत्रं, मुलांसाठी कॉम्प्युटर, शाळेला जाण्यासाठी नवीन बसेस हे सगळं तर पाहायला मिळतं, पण जीव रमतो तो लहान मुलांच्या विभागात. तिथं दाखल झालेले नवीन चेहरे पाहताना मन भरून येतं. भरत या मुलांमध्ये फार लोकप्रिय. तो आला की ती त्याच्या भोवती जमतात. त्याच्याशी बोलतात. कुणी त्याच्या अभ्यासाविषयी सांगतं, कुणी परीक्षा पास झाल्याचं सांगतं, कुणी त्याचा ड्रेस फारच ढगळ किंवा आखूड दिल्याचं सांगतं, कुणी एखाद्या मोठ्या पोरानं मारल्याची तक्रार करतं. मग भरत कुणाचे मार्क चांगले पडल्याबद्दल अभिनंदन करतो, तर कोणाच्या तक्रारी दूर करण्याचं आश्‍वासन देतो. 


"चला आता आपण एड्‌सबाधित मुलांच्या विभागात जाऊ. खरं तर ही मुलं काही वेगळी नसतात, तीही इतर मुलांसारखीच हसत-खेळत असतात. पण काहींचे चेहरे निस्तेज वाटतात; काहींच्या हातापायाच्या काड्या असतात. पण बरीचशी इतर मुलांसारखी! त्यांच्याकडे जास्त लक्ष ठेवून औषधोपचार करता यावेत म्हणून हा वेगळा विभाग,'' भरत म्हणाला. त्या विभागात गेल्यावरही भरतभोवती गराडा पडला. घरातलं मोठं माणूस बाहेरून घरात आल्यावर मुलं करतात तशाच एकमेकांबद्दल तक्रारी. 



"का रे दशरथ दिसत नाही कुठं?'' भरत मुलांना विचारतो. ती मुलंही इकडं-तिकडं पाहतात. पण तेवढ्यात तो आपली ढगळ चड्डी कमरेवर ओढत येतो आणि त्याच्या पायाला मिठी मारतो. 



"कवा येणार माझा बाबा?'' तो त्याला विचारतो. "अजून चार-आठ दिवस लागतील. ताप आलाय ना त्याला! मग बरं करायला नको का? बरं वाटलं म्हणजे येईल आणि मग दशरथला घेऊन जाईल. त्यानं सांगितलं ना तुला, रडायचं नाही, या मुलांच्यात राहायचं, खेळायचं, शिकायचं. तू नाही ना रडत?'' भरत म्हणाला. "नाही'' मान हलवत दशरथ म्हणाला. 



"मग मी सांगतो हं त्याना तुम्ही लवकर बरे व्हा आणि आमच्या दशरथला घरी घेऊन जा!'' 
"ही काय भानगड आहे. खरंच त्याचे बाबा आजारी आहे का?'' मी स्नेहालयामधून बाहेर पडताना विचारले. 
काय करणार काका! पोरांशी खोटं बोलावं लागतं. ही एड्‌सबाधित मुलं. या विभागातली बहुतेक मुलंही लालबत्ती भागातून आम्ही आणतो. आईला पोटासाठी देहविक्रय करावा लागतो. त्यातून तिला एड्‌स होतो. ही मुलं जन्माला येतात ती एड्‌स घेऊन!'' 
"म्हणजे हा दशरथ?'' मी म्हणालो. 



"नाही. ती दोघं कामगार होती. कोल्हार या गावी लहानशा झोपडीत राहात होती. दोघंही काम करून पोटापुरतं मिळवत होती. पण नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा नडला असावा. अगोदर नवऱ्याला आणि नंतर त्याच्या बायकोला एड्‌स झाला असणार. परिणाम जन्मतःच दशरथ ते दुखणं घेऊन जन्माला आला. 



आता मला दशरथबद्दल सगळीच माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली. म्हणून मी विचारलं. 
"मग दशरथ इथं कसा काय आला.'' 
"ती एक करुण कहाणीच आहे. दशरथला जन्म देऊन काही दिवसांतच त्याची आई वारली. पहिले काही दिवस त्याच्या वडिलांनी किरकोळ काम करून शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या मदतीनं त्याला सांभाळलं. पुढं-पुढं त्याला काम करवेना. शेवटी भीक मागू लागला. तोपर्यंत दशरथ पाच-सहा वर्षांचा झाला होता. मग ती दोघं भीक मागू लागली. झोपडीचं भाडं देता येईना म्हणून तिथूनही त्यांना हाकललं. आपली फाटकी अंथरुणं आणि कटोरा घेऊन कोल्हारच्या स्टॅंडवर आली. भीक मागून दिवस काढू लागली. खाण्याची आबाळ झाली की हा रोग उफाळतो. बाप आजारी पडला. तापानं फणफणला. एकटा दशरथ भीक मागून आणायचा आणि त्याला भरवायचा. देव कशी बुद्धी देतो बघा! सहा वर्षांचं हट्ट करण्याचं, लाड करवून घेण्याचं ते वय; पण त्यालाही कळलं की आता आपल्याला या बापाशिवाय कोणी नाही. तोच एक आधार आहे. बापानं पोराची काळजी घ्यायची तिथं पोरगं बापाची घेत होतं. पाणी आणून पाजत होतं. भीक मागून पहिला घास त्याच्या तोंडात घालत होतं. त्याला जगवत होतं आणि आपणही जगत होतं.'' 



"मग तुम्हाला हे कसं कळलं?'' पाणावल्या डोळ्यांनी मी विचारलं. ""तेच सांगणार आहे. आमच्या स्नेहालयाचे एक आधारस्तंभ ऍड. श्‍याम असावा नाशिकडून येताना त्या स्टॅंडपाशी थांबले तेव्हा दशरथ आला त्यांच्याकडं काही मागायला. त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. बाप आजारी असल्याचं कळल्यावर तिकडं जाऊन पाहिलं. आजूबाजूच्या लोकांनी त्यांची कहाणी सांगितली. यांना कोणीही नातेवाईक नाहीत याची खात्री करून त्यांनी त्यांना स्नेहालयात आणलं. वडील अगदीच अत्यवस्थ असल्यानं त्यांना स्नेहालयात ठेवणं शक्‍य नव्हतं, म्हणून सरकारी दवाखान्यात दाखल केलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर मी ज्या ज्या वेळी येथे यायचो, तेव्हा मला बघितल्यावर दशरथ कुठूनही यायचा आणि मला विचारायचा, "कवा येणार माझा बाबा?' आणि आठ-दहा दिवसांत बरा झाल्यावर येईल आणि मग आमच्या दशरथला घेऊन जाईल एवढं ऐकलं की हसत खेळायला निघून जायचा.'' भरत म्हणाला. 
"पण आता बरी आहे का त्याच्या वडिलांची तब्येत,'' मी विचारलं. 



"तो महिन्यापूर्वीच वारला. पण आता हे कसं सागायचं एवढ्याशा जिवाला? तसा तो इथं रमला आहे. इथल्या सगळ्या कार्यक्रमात भाग घेतो. हुशार आहे. हळूहळू सगळं शिकतो. इतर कोणाजवळही वडिलांची आठवण काढीत नाही. फक्त मला पाहिल्यावरच त्याला त्याच्या वडिलांची आठवण येते आणि मला येऊन बिलगून विचारतो.'' कवा येणार माझा बाबा?'' 



"फक्त तुमच्याजवळच का बरं तो ही गोष्ट विचारतो, इतर कोणाजवळ का नाही?'' मी विचारलं. 
"कारण तो बुद्धीनं फार शार्प आहे. तो आणि त्याचे वडील बरोबरच इथं आले होते. पण इथून मीच त्याच्या वडिलांना स्नेहालयच्या व्हॅनमधून दवाखान्यात पोचवलं. म्हणून तो मलाच हा प्रश्‍न विचारतो.'' आता मलाही, मी जेव्हा स्नेहालयात जातो तेव्हा त्याला भेटल्याशिवाय राहावत नाही. त्याचा निरागस चेहरा पाहिला की हृदय पिळवटतं. बिचाऱ्याचं आयुष्य किती आहे माहीत नाही; पण स्नेहालय त्याची काळजी घेतं. लवकरच त्याला कळू लागेल की, आपल्याला आई-बाप कोणी नाहीत. आता स्नेहालय हेच आपले आई आणि बाबा. हे लक्षात येईल तेव्हा तो कोणालाच विचारणार नाही, "कवा येणार माझा बाबा?' एड्‌सच्या रोगाची शिकार झालेली ती मुलं. त्यापैकीच दशरथही एक. बिचाऱ्याला आपलं आयुष्य किती आहे हे माहीत नाही. ज्या वयात लाड करून घ्यायचे त्या वयात कळतेपणानं त्यानं वडिलांना जगवलं. आता वडिलांची वाट बघत तो दिवस कंठत आहे. मदतीसाठी ः भरत कुलकर्णी, स्नेहालय भवन, महात्मा गांधी मैदान, नगर- 414 001. संपर्क ः 9011020176. 

No comments:

Post a Comment