स्व. बाळासाहेब भारदे सहकारमंत्री असताना सहकारी तत्त्वावर साखर कारखाने सुरू करण्यासाठी गती मिळाली. आता त्यांच्याच जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधक एकत्रपणे येऊन सहकार चळवळ मोडीत काढण्याचे करीत असलेले प्रयोग दुर्दैवी आहेत, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी व्यक्त केली.
स्व. बाळासाहेब भारदे प्रेरणा पुरस्कारांचे आज सहकार सभागृहात वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. स्व. भारदे यांचे पुत्र मोहन भारदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पुरस्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार विजय औटी, माजी मंत्री बाबुराव भारस्कर, कृषितज्ज्ञ डॉ. मुकुंदराव गायकवाड, सत्यशोधक चळवळीचे प्रा. नारायण शित्रे, समाजिक कार्यकर्ते हनीफ शेख यांची उपस्थिती होती. ह.भ.प. जंगलेशास्त्री महाराजांच्यावतीने त्यांचे शिष्य भागवत महाराज, माजी स्वातंत्र्य सैनिक इंदुताई रसाळ यांची नात कार्यक्रमास उपस्थित होत्या. तुतारी आणि सनई चौघड्याच्या निनादात माजी मंत्री ढाकणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ढाकणे म्हणाले, स्व. भारदे देशभक्त, आधुनिक संत आणि मानवतावादी महापुरुष होते. देशाशिवाय त्यांना दुसरे काहीच दिसले नाही. त्यांच्यासारखी काळाची जाणीव आजकालच्या मोठय़ांना राहिली नाही. मिळतं-जुळतं घेऊन सत्ता, संपत्ती मिळविली जाते. त्यातून दंडुकेशाही निर्माण झाली आहे. सात पिढय़ांच्या मालकीची संपत्ती तयार करण्याची स्पर्धा लागली आहे. पैसा हीच एक जात शिल्लक आहे. ज्याच्याकडे पैसा, मग्रुरी,सत्ता असेल त्यांच्याशी सोयरीक केली जाते. नेत्यांची मस्ती कमी झाली नाही, तर लोक त्यांची मस्ती उतरवतील. सहकार चळवळ खत्म करून स्वमालकीची चळवळ उभारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. शेतकर्यांसाठी रक्त सांडण्याची भाषा करणार्यांचे विधानसभेत रक्त का गोठते? जिल्हा कसा आहे? कसा होता? आणि कसा राहिल? यासाठी दि. १ जानेवारीपासून यात्रा काढणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी भारदे यांच्या आठवणी सांगितल्या. भारदे यांच्यासारखी मोठी माणसे बघायला मिळाली, हेच माझे भाग्य आहे. महाराष्ट्र राज्यात पुरोगामी कायदे मंजूर झाले, त्या सभागृहाचे भारदे अध्यक्ष असणे ही बाब अभिमानास्पद आहे. विधानसभेत वैचारिक दिशा देण्याची त्यांची भूमिका होती. भारदे यांच्या विचारांच्या रसवंतीने ऐकणारा तृप्त व्हायचा. त्यांच्या कुळाचे आपण आहोत का?याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आज समाजाचे प्रश्न तीव्र आहेत, मात्र आंदोलने कुठेच होत नाहीत. गरीब लोकांबाबत मोठय़ांमध्ये बेपवाई वाढली आहे.
आमदार औटी म्हणाले, जनतेच्या हिताच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केली की यश मिळते, याचा अनुभव विधानसभेत घेतला. विधानसभेत बसताना दुष्काळी भागाचा प्रतिनिधी असल्याची जाणीव ठेवली. माझा सन्मान म्हणजे माझ्या मतदारसंघातील तीन लाख लोकांचा सन्मान आहे. गुरुप्रसाद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. वंदना भारदे, गणेश पटारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गौरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार समितीचे सदस्य डॉ. गोपाळराव मिरीकर, सतीश काणे यांचा ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज ठाकरे यांच्या परीक्षेचे कौतुक
उमेदवारीसाठी लाळ धरली जाते. जात,सोयरे, नाते, खर्च करण्याची क्षमता, पैसा आणि शेवटी दंडुकेशाही असेल तरच उमेदवारी दिली जाते. अशा परिस्थितीत उमेदवारांसाठी परीक्षा घेण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय चांगला आहे. आमच्या काळीही परीक्षा होत्या. त्याचे निकष वेगळे होते. आज त्यामध्ये बदल झाला आहे. वाटून घेतले की सगळ्य़ांचे जमते, असा सध्याचा काळ आहे.
No comments:
Post a Comment