Saturday, 14 April 2012

माझा साड्डा भारत कल्पंडी


माझा साड्डा भारत कल्पंडी
लोकमत ऑक्सिजन - दिनांक : 13-04-2012 
२३ राज्यांतले ४00 तरुण. त्यांना पहिल्यांदा भारत दिसला. आणि त्यांनी ठरवलं, आता कामाला लागायचं.!


आज आपल्या समाजापुढे असलेले अक्राळविक्राळ प्रश्न सोडवण्याची ताकद असणारे तारुण्य आज आपल्या देशात आहे का.?
नगरमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय युवा एकात्मता शिबिरात या प्रश्नाचे उत्तर माझ्यासारख्या काही तरुणांना मिळाले. राष्ट्रीय युवा योजनेचे संस्थापक डॉ. एस. एन. सुब्बराव यांचे नियोजन, अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन आणि स्नेहालय संस्था यांच्या वतीने सात दिवसांचे राष्ट्रीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. चर्चा-भाषणे, सांस्कृतिक आदान - प्रदान यांपलीकडे जात सर्मथ भारताच्या निर्मितीसाठी तरुणाईला व्यक्तिगत स्तरावर सक्रिय करण्याचा या शिबिराचा हेतू होता.
देशभरातील २३ राज्यांतून आलेल्या ४00 युवकांनी नगर जिल्ह्यातील धार्मिक तणाव असणार्‍या विविध भागांत भेटी दिल्या. श्रमदानातून झोपडपट्टीत एक उद्यान विकसित केले. भाषा, विचार, संस्कृती यांचे आदान-प्रदान झाले.‘‘साडा है भाई, साडा है, सारा भारत साडा है।’’ ही पंजाबी युवकांची घोषणा असो वा ‘‘कल्पंडी-कल्पंडी, भारत देशम कल्पंडी’’ ही तेलगू घोषणा असो. विविध भाषांमधील ‘जोडो भारत’चा जयघोष आठवडाभर सुरू होता. रोज ऐशआरामी, शहरी जीवन जगण्याची सवय असलेले तरुण-तरुणी शिबिरातील सामूहिक व्यवस्थेशी इतके लवकर समरस झाले की, कोण बिझनेसमनचा मुलगा कोण क्लास वन अधिकार्‍याची मुलगी आणि कोण सामान्य मध्यमवर्गीय घरातला या आर्थिक भेदाच्या भिंती नाहीशा झाल्या आणि आपण भारतीय नागरिक आहोत या भावनेने सारे आपला देश समजून घेऊ लागले.
शिबिराला आलेल्या तरुण मुलांचं म्हणणं एकच होतं आम्हाला जगणं शिकायचंय, भारत पाहायचाय, माणसं वाचायचीत. त्या मुलांना भेटले भ्रष्टाचाराविरुद्ध लढा पुकारणारे अण्णा हजारे. अण्णा म्हणाले, ‘‘आधी स्वत:ला बदला म्हणजे देश आपोआप बदलेल. शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन आणि थोडासा त्याग करता आला तर नक्कीच चांगली देशसेवा घडू शकते.’’ अण्णांचं साधं पण जगता येईल असं बोलणं ऐकून जमलेले सारे आपल्या आत डोकावून पाहायला तयार झाले. आपल्या भाषणातच या युवकांना अण्णांनी राळेगणसिद्धी गावाला येण्याचे आमंत्रण गेले. सगळी तरुण मुलं त्यांना भेटायला गावात गेली. तिथं जे अण्णा भेटले ते प्रत्येकाच्या लहानसहान गोष्टीची काळजी घेत होते. माणसे ‘मोठी’ का होतात, ती मोठी असतात म्हणजे किती साधी असतात हे यानिमित्तानं आम्हाला पहिल्यांदाच कळलं.
नगर जिल्ह्यात जामखेड, नेवासा, संगमनेर या तालुक्यांच्या ठिकाणी मागील काही वर्षांंत जातीय/धार्मिक तणावाच्या अप्रिय घटना घडल्या होत्या. मराठवाडयाचे प्रवेशद्वार असणारे जामखेड हे व्यापारी शहरही दंगलीमुळे अनेक दिवस बंद होते. याचा मोठा फटका सामान्य जनतेलाच बसला. शेतकरी, व्यापारी यासोबत शाळकरी मुलांना ऐन परीक्षेच्या काळात घरी बसावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी नेवासा, जामखेड, संगमनेर या ठिकाणी विशेष कार्यक्रम घेण्याचे सुचविले होते. राष्ट्रीय भावना आणि सर्वधर्मसमभाव वाढीस लागण्याबरोबरच माणसांशी थेट संवाद हा या कार्यक्रमांचा हेतू होता. आम्ही तरुणांनी या गावातल्या अनेक संस्थांमध्ये जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या. लोक प्रेमानं बोलले, त्यांना समजावताना त्यांनीही अनेक अनुभवाच्या, समजुतीच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. भारतीय म्हणून आपली मनं कशी जोडली गेलेली आहे याचा प्रत्यय आम्हाला आला.
समारोपाच्या आदल्या दिवशी सगळ्यांनी ‘स्नेहालय’ संस्थेला भेट दिली. हे शिबिर केवळ भावनिक एकात्मता निर्माण करण्यासाठी नव्हते. देशाचे काम म्हणजे देशातील गरीब-वंचितांच्या जीवन बदलाचे काम असते हे या संस्थेत सगळ्यांना पटले. तुटपुंजी आर्थिक संसाधने असताना ही संस्था झोपडपट्टया - लाल बत्ती विभाग - महिला- वंचित बालके यांच्यासाठी काम करते. ही कामे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी, करण्यासाठी या संस्थेत येऊन स्वत: काम करा, असं आवाहनही ‘स्नेहालय’ने तरुणांना केलं. सतत टीका आणि तक्रार न करता आपापल्या गावात एखादे काम आपणही सुरू करावे, ते नेटाने करावे अशी प्रेरणाही स्नेहालयने दिली. 
सात दिवसांच्या कालावधीत देशभरातून आलेले तरुण मैत्रीच्या एका धाग्यात बांधले गेले. निघताना फोन नंबरची देवाणघेवाण तर झालीच पण आपण सगळे मिळून बदलांची सुरुवात करू, कामाला लागू असा विश्‍वासही सगळ्यांना वाटला. ‘भारत’ जोडला जातोय या भावनेवर शिक्कामोर्तब झाले..!
- संदीप कुसळकर

No comments:

Post a Comment