Tuesday, 22 January 2013

मेजर दिनुभाऊ कुलकर्णी यांचे निधन

मेजर दिनुभाऊ कुलकर्णी यांचे निधन
अहमदनगर। दि. २१ (प्रतिनिधी)
ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक, संघटक मेजर प्रा. महादेव वासुदेव तथा दिनुभाऊ कुलकर्णी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी शोभाताई, मुलगा स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, पुतण्या डॉ. शिरीष, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांचे अनेक विद्यार्थी हळहळले.
स्व. कुलकर्णी यांनी पेमराज सारडा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख म्हणून दीर्घकाळ काम केले. या काळात त्यांनी हजारो खेळाडू घडविले. त्यातील अनेकजण राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले. महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य होते. मल्लखांबाप्रमाणेच खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक या खेळांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक व संघटक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
अँकॅडमी ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या स्थापनेत दिनुभाऊंचा पुढाकार होता. या संघटनेच्या माध्यमातून १९८८ पासून त्यांनी अनेक उपक्रम राबविले. नगर येथे विविध खेळांच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कुलकर्णी यांनी एनसीसीचे मेजर हे पद भूषविले. एनसीसीच्या अनेक शिबिरांचे व्यवस्थापन त्यांनी यशस्वीपणे केले. हिंद सेवा मंडळाचे सभासद तसेच श्री. सर्मथ विद्या प्रसारक मंडळाचे ते संस्थापक सदस्य व विद्यमान उपाध्यक्ष होते. संस्थेच्या विस्तारासाठी तसेच नव्या उपक्रमासाठी त्यांनी अहोरात्र धडपड केली. बांगला युद्धात वीरमरण प्राप्त झालेले कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी हे दिनुभाऊंचे बंधू होत.
जुन्या मंगळवार बाजारातील निवासस्थानापासून स्व. कुलकर्णी यांची अंत्ययात्रा चितळे रोड, सांगळे गल्ली येथील सर्मथ शाळा, दिल्लीगेट मार्गे अमरधाममध्ये पोहोचली. तेथे त्यांच्यावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार अनिल राठोड, माजी आमदार दादा कळमकर, राजीव राजळे, चंद्रशेखर कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संग्राम जगताप, माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण, अँड. अभय आगरकर,शंकरराव घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्मथ विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, स्नेहालयासह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्व. दिनुभाऊंच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. स्व. कुलकर्णी यांच्या निधनाने सावेडी आणि सांगळे गल्लीतील सर्मथ शाळेचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते.

No comments:

Post a Comment