Sunday, 12 February 2012

समाजाला सर्मपित सहजीवन... alhad kashikar --- Sunday, February 12, 2012 AT 03:30 AM

स्नेहालयातील सहजीवन :-

ज्यांचा काहीही दोष नाही अशा मृत्यू जवळ आलेल्या अत्यंत निरागस अशा एड्‌सग्रस्त मुलांचं घर म्हणजे अहमदनगरमधील 'स्नेहालय'. डॉ. गिरीश आणि प्राजक्ता कुलकर्णी 'स्नेहालय' चालवतात. 'स्नेहालय'ची खरी लढाई देहविक्रय करणाऱ्या अल्पवयीन मुलींना त्यातून सोडवण्याची आहे. कुंटनखाना चालवणाऱ्या गुंड, दलालांशी दोन हात करुन अल्पवयीन मुलींना त्यातून बाहेर काढण्याचं अत्यंत धोक्‍याचं काम ते करतायत. 1996 साली गिरीश आणि प्राजक्ता यांची ओळख झाली. आंतरजातीय विवाह असल्याने घरच्यांचा विरोध होता. लग्न करताना गिरीश यांनी प्राजक्ताला कल्पना दिली होती की ते परंपरागत संसारी नवरा होऊ शकणार नाही. सोबत जेवणं, बायकोला संध्याकाळी फिरायला घेऊन जाणं त्यांना शक्‍य होणार नाही. लग्न झाले त्यावेळी गिरीश यांना फक्त 3000 रु. पगार होता. त्यानंतर 'स्नेहालय'चा विस्तार झपाट्याने होत गेला. 1998 साली त्यांना मुलगी झाली. 2004 सालापर्यंत प्राजक्‍तानी कुटुंबाला प्राधान्य दिलं पण त्यानंतर मात्र झोकून देऊन गिरीश सोबत काम सुरू केलं. 



2004 साली प्राजक्ताच्या पुढाकाराने 'स्नेहांकुर दत्तकविधान केंद्र' सुरू झालं. कुमारी माता, अनौरस मुलं, वेश्‍यांची मुलं यांना सांभाळण्यासाठी या केंद्राची योजना सुरू झाली. प्राजक्ताची तिच्या कामावरची निष्ठा असामान्य आहे, हे सांगताना गिरीश यांच्या चेहऱ्यावर खूप अभिमान दिसतो. सहजीवनाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली की, 'वादविवाद होतच नाही असं नाही मात्र आम्ही एकमेकांचं व्यक्तीगत स्वातंत्र्य जपतो'. स्नेहालयच्या इंग्लिश मीडियम शाळेत 195 मुलं शिकतात. त्यातले 180 मुलं एड्‌सग्रस्त आहेत. त्यांचं शिक्षण, औषधं, जेवण हे सर्व 'स्नेहालय' करतं. वेश्‍याव्यवसायातून बाहेर पडलेल्या 35 स्त्रियासुद्धा इथे राहतात. स्नेहालयच्या 'मुक्तीवाहिनी'ने आजवर अनेक मुलींना कुंटनखान्यातून, दलालांच्या तावडीतून सोडवून आणलंय. त्यातल्या 150 मुलींचं पुनर्वसन केलंय. 

गिरीश जे काम करतात ते अत्यंत धोक्‍याचं आहे. जीवावर बेतणारं आहे. या कामात खुपदा अपयशही येतं. वेश्‍याव्यवसायातल्या काही मुली खूप प्रयत्न करुनही जेव्हा पुन्हा व्यसनांकडे वळतात तेव्हा मनाला खूप खिन्नता येते. त्यावेळेला प्राजक्‍ता अत्यंत प्रेमाने समजावून सांगते, पाठबळ देते त्यामुळे मग मानसिक संतुलन कायम राहते आणि योग्य निर्णय घेतले जातात, गिरीश प्राजक्ताबद्दल कृतज्ञतेने बोलत असतात अन्‌ बोलता बोलता एका क्षणी ते म्हणतात, माझं प्राजक्तावर खूप प्रेम आहे... 

स्नेहालयाशी संपर्क साधण्यासाठी इ मेल आयडी व फोन नं. 
snehankur@snehalaya.org
9011020173 

चाकोरीबाहेरच्या, वेगळ्या आणि व्यापक सहजीवनाची ही उदाहरणं बघितल्यावर वाटतं की, सगळ्यानांच असा सूर्य नाही पेलता येणार. पण आसपासच्या दोन लोकांच्या जीवनातही आपण आनंद निर्माण करु शकलो तरी ते खूप आहे. आपआपल्या क्षमतेनुसार भवतालचं जग अधिक सुंदर करण्यासाठी आपण खारीचा वाटा तर नक्कीच देऊ शकतो. कवी दत्ता हलसगीकरांच्या शब्दात 



'ज्यांची बाग फुलून आली 
त्यांनी दोन फुलं द्यावीत 
ज्यांचे सूर जुळून आले 
त्यांनी दोन गाणी गावीत 
आभाळाएवढी ज्यांची उंची 
त्यांनी थोडे खाली यावे 
ज्यांचे जन्म मातीत मळले 
त्यांना उचलून वर घ्यावे'